“तिचं कामच आहे ते..”
हे वाक्य आपल्या आईकडून मितालीला खूपदा ऐकावं लागे. आई असली तरी आपल्या वहिनी बद्दल तिला थोडंही कौतुक असू नये? हे तिला सतत वाटे.
दुपारची वेळ होती. सर्वजण जेवण करून आपापल्या खोलीत गेले. वहिनी आपली किचनमधला पसारा आवरत होती. आई बाहेर गेलीये हे लक्षात येताच मिताली वहिनीकडे गेली. कारण आई घरी असली की सहसा मितालीला वाहिनीजवळ जास्त जाऊ देत नसे, आपल्या लेकीला काही काम करावं लागेल या भीतीने. मिताली वहिनीजवळ गेली आणि विचारलं, “काही मदत करू का?”
“अहो ताई तुम्ही कशाला? मी पटकन आवरून घेईन असुद्या..”
“पटकन कसलं, ओट्यावर बघ किती पसारा आहे, मुंगीलाही शिरायला जागा नाही. सिंकमध्ये भांडी…अबब… काय वहिनी, एकटीने करणार हे?”
“अहो ताई हे कायमचं आहे…आजच नाही, आणि मला सवय असल्याने मला काही वाटत नाही..”
“ते काही नाही, मी भांडी धुवायला घेते..”
“अहो ताई अजिबात नाही ह… मी नाही ऐकणार तुमचं..”
“अगं वहिनी त्या निमित्ताने तुझ्याशी बोलणं तरी होईल..”
मितालीने काही ऐकलं नाही.. तिने भांडी घासायला सुरवात केली. तेवढ्यात तिचं लक्ष एका पितळी खलबत्त्याकडे गेलं..
“अय्या… हा खलबत्ता किती सुंदर आणि दणगट आहे..”
वाहिनीचा चेहरा खुलला..
“छान आहे ना?? माझी दोन वर्षांपासून हौस होती, असा खलबत्ता घ्यायचा म्हणून…पण फार महाग होता ओ, मग मी काय केलं…मला ओवळणीचे, काही मुलांना आलेले असे पैसे जमा केले आणि घेतला..”
“कितीला मिळाला हा..”
“फार महाग, 3 हजार चा आहे..”
मिताली गोंधळलीच, खरं तर ही रक्कम मिताली साठी अगदी जुजबी होती, पण वहिनीला ही रक्कम जमा करण्यासाठी दोन वर्षे वाट बघणं आणि पैसे जमा करणं किती दिव्याचं काम होतं हे बघून मितालीला खूप वाईट वाटलं..
“खरंच महाग आहे हो..” वाहिनीचा मान ठेवण्यासाठी मिताली म्हणाली…
“वहिनी, तू आणि दादा सुद्धा तिकडे असायला हवं होतं…तिकडे पैसा तर आहेच पण एक वेगळंच जीवन आहे..एकदा तरी अनुभवायला हवं..”
त्यांचं बोलणं चालू असतानाच आई तिथे आली, आणि म्हणाली,
“कशाला तिला भडकवते, ते दोघे कसे येतील तिकडे??”
“आम्ही गेलो तसं..”
“मग आमच्याकडे कोण बघेल??”
“आमच्या सासू सासऱ्यांकडे कोण बघतं?? तेव्हा तर आम्हाला जाण्यासाठी आग्रह करत होतात..”
मितालीला राहवलं नाही आणि वाद घालायला तिने सुरवात केली, पण वहिनीला हे नको होतं, तिने पडती बाजू घेत म्हणाली,
“अहो ताई आम्हाला खरंच हौस नाहीये बाहेरच्या जगाची… आम्हाला इथे काय कमी आहे..”
“बघ…सगळं आयतं मिळालं की मज्जाच असते…स्वतः सगळं करावं लागलं की मग समजतं, तुझ्यासारखं थोडीच जमेल सर्वांना..”
सासूबाईंना आपल्या मुलाने आणि सुनेने बाहेर गेलेलं चालणार नव्हतं आणि इथे राहतात त्याचीही त्यांना अडचण, सगळं आयतं मिळतंय म्हणून…मिताली आईवर खूप चिडली, पण वहिनीने त्यांना शांत करत बाजूला नेलं..
“ताई, आई आहेत त्या तुमच्या… नका वाद घालू..”
“वहिनी अगं स्वतःची बाजू मांड कधीतरी…”
“बाजू मांडणं म्हणजे घराची शांतता भंग करणं..जे मला आवडणार नाही..”
एवढं म्हणत वहिनी निघून गेली. खोलीत जाऊन गपचूप रडत होती, तेवढ्यात तिथे आशुतोष आला..