प्रदीपचं सगळं अगदी सुरळीत होतं. थोडक्यात तो कम्फर्ट झोन मध्ये होता. पैसे येत असायचे, सगळे नातेवाईक, सगळा गाव त्याच्या सोबत असायचा.
गावात कुणाच्याही घरी काहीही कार्यक्रम असो, लग्नकार्य असो. प्रदीप सर्वात पुढे असायचा. गावातली लोकं त्याला खूप मान देत. तो सुद्धा यातच खुश असायचा.
प्रदीपने दुसऱ्या शहरात राहून खूप प्रगती केली. स्वतःचा व्यवसाय सुद्धा टाकला. अधूनमधून त्याचे पेपरमध्ये फोटोही यायचे. कामाच्या व्यापात त्याचं गावी येणं होत नसे.
एकदा गावात त्यांच्याच एका चुलत भावाचं लग्न ठरलं. प्रदीप कामाला लागला. माधवला सुट्ट्या मिळाल्याने त्यानेही काही दिवस गावी यायचं ठरवलं.
माधव येणार म्हणून प्रदीप आणि घरच्यांना आनंद झाला.
“माधवा…अरे आपल्या पिंट्याचं लग्न आहे, यावेळी त्याला तरी हजर असशील ते एक बरं झालं…नाहीतर गाववाले तुला विसरता की काय अशी मला भीती वाटू लागलेली..”
“यावेळी जास्तीची सुट्टी काढून आलोय दादा…सर्वांना भेटून घेईन..”
प्रदीप गावी आला तसं त्याला भेटायला सर्वजण येऊ लागले. पिंट्याच्या घरचे राजकारणात असल्याने बरीच मोठी राजकीय मंडळी हळदीच्या कार्यक्रमाला आलेली. त्यातच एक मोठा नेता येणार म्हणून सर्वांची धावपळ सुरू झाली. एकीकडे हळद आणि दुसरीकडे या नेत्यांच्या सत्काराचा कार्यक्रम सुरू होता.
सर्व मंडळींना खुर्चीवर बसवण्यात आले. गावचे सरपंच, नेते मंडळी पुढे बसले होते. एक खुर्ची रिकामी होती. पिंट्याच्या वडिलांनी पुढे येऊन म्हटले,
“आज आपल्या गावी अनेक मोठी नेते मंडळी आलेली आहेत, यांनी आपल्या गावच्या विकासासाठी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत…यांच्या सत्कारासाठी आपण आपल्याच गावातील एका होतकरू आणि सर्वांची मदत करणाऱ्या अश्या व्यक्तीला बोलवणार आहोत..”
प्रदीप चमकला, त्याला गावात राहून बरीच वर्षे झालेली, त्याला पूर्ण गाव मानत होतं. त्यामुळे हे आपल्यालाच बोलवणार अशी त्याची खात्री पटली..
“तर मी विनंती करतो की या गावातील श्री. माधव यांनी पुढे येऊन आसनस्थ व्हावे..”
प्रदीप दोन पावलं मागे गेला..
ज्या गावासाठी, ज्या माणसांसाठी आयुष्य वेचलं, त्यांनी माझी आठवणही ठेऊ नये? आजपर्यंत प्रत्येक लग्नात, प्रत्येक कार्यात मी नेहमी पुढे असायचो…पण ज्या मुलाने गावाचा विचार न करता गाव सोडला, आज त्यालाच गावाने उचलून धरावे?
एकीकडे आपल्याला बोलावलं नाही याचं वाईट वाटत असलं तरी आपल्या भावाला समोर बघून त्याला आनंदही होत होता.
*****