ती स्वयंपाक घराच्या दारा आडून तिच्या नवऱ्याचं आणि सासूच बोलणं ऐकत होती. तिच्या मनात संमिश्र भाव दाटले होते. खरंतर तिला, तिच्या नवऱ्याच्या बोलण्याचा आणि वागण्याचा जरा धक्काच बसला होता आणि आश्चर्यही वाटत होतं.इतर वेळी आई वडिलांसमोर चकार शब्द न काढणारा तिचा नवरा आज मात्र स्वतःच्या आईशी अगदी तावातवाने बोलत होता, त्याच्या आईच्या सर्व सबबी खोडून काढत होता. पण तिची सासू मात्र ‘माझंच म्हणणं खरं’ हा हेका सोडायला तयार नव्हती.तिचा नवरा आणि सासू यांच्यात सुरू असलेल्या वादविवादाच्या मुद्द्यावरून ती तीन-चार वर्ष मागे गेली….
“कशी होते मी नुकतेच लग्न झाले होते, त्या वेळी अवखळ, अल्लड नवपरीणीता. लग्नानंतरच्या नव्या आयुष्यासाठी किती उत्सुकता होती माझ्या मनात. होणाऱ्या जोडीदाराकडून मी किती अपेक्षा ठेवल्या होत्या, त्याच्या सोबत सहजीवनाची किती स्वप्न बघितली होती, स्वतःच्या घरट्याची एक सुंदर प्रतिमा मनात निर्माण केली होती, पण प्रत्यक्षात मात्र झालं वेगळच.”ती मनाशी विचार करत होती,“अबोल असणारा माझा नवरा लग्नानंतर आणखीनच घुमा झाला. त्याची नोकरी दूरच्या महानगरात. घरी त्याची तीन लहान भावंडं आणि आई वडील. महानगरात घर घेणे शक्य नसल्याने तो तिथे महानगरात भाड्याच्या खोलीत राहत होता आणि मी इथे सासरी.”
तेवढ्यात तिच्या कानावर तिच्या सासूचा चढलेला आवाज आला.
सासू – “मी केव्हाची बघते आहे, काय सारखं बायको बायको करतो आहेस रे? माझ्या बायकोने हे केलं, माझ्या बायकोने ते केले, माझ्या बायकोने घर सांभाळलं. म्हणे तुमच्या सगळ्यांची काळजी घेतली. काळजी घेतली म्हणजे? प्रत्येक सुनेला ते करावंच लागतं, तिचं कर्तव्यच असते ते! काही जगावेगळे नाही केलं तुझ्या बायकोने आणि खबरदार माझ्या मुलीची तुलना तुझ्या बायको बरोबर केलीस तर! याद राख माझ्याशी गाठ आहे!”एवढं बोलून सासूबाई तरातरा स्वयंपाक खोलीत आल्या आणि तिच्यावर बरसल्या.सासु -”काय ग ये सटवे! काय जादू केलीस माझ्या मुलावर? कालपर्यंत आई आई करणारा, बहिणींनां तळहाताच्या फोडांप्रमाणे जपणारा माझा मुलगा आज तुझ्या ताटाखालचं मांजर कसा झाला ग?”नवरा -”आई तू तिला कशाला काही बोलते आहेस? तिने काही जादू वगैरे केली नाही. गेले कित्येक दिवस मी तुमच्या सगळ्यांचे वागणं बघतो आहे, तु तिला घरात फक्त राबवून घेते. बिन पैशाची हक्काची मोलकरीण मिळाली आहे तुला.”
सासू -”अरे तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? उचलली जीभ लावली टाळ्याला, म्हणे मी तिला राबवून घेते. मी लग्न होऊन सासरी आले होते तर याच्या दसपट काम करत होते. एवढाच बायकोचा पुळका येत असेल तर घेऊन जा स्वतःबरोबर तिला.”नवरा -”आई तुला चांगल्याने माहिती आहे, त्या मोठ्या शहरात माझा पगार मलाच कमी पडतो, हीला कुठे सोबत घेऊन जाऊ? पण तू स्वतःकडे आणि तुझ्या मुलींकडे थोडंसं लक्ष दे. ज्या अपेक्षा तू तुझ्या सुनेकडून करते आहे, त्याच अपेक्षा तुझ्या मुलींच्या सासरच्यांनी तीच्याकडून केल्या तर बिघडलं कुठे?”गेल्या पाच वर्षात नवऱ्याकडून एकही प्रेमाचा, काळजीचा शब्द न ऐकलेल्या तिला, नवऱ्याच्या शब्दांचा मोठाच आधार वाटला आणि नकळतच तिचे डोळे भरून आले.सुरुवातीला तिच्या नवऱ्याला आणि तिला एकमेकांकडून खूप जास्त अपेक्षा होत्या आणि अपेक्षाभंग झाल्यामुळे त्यांचे वादही व्हायचे, कधीकधी भांडणंही व्हायची. आणि मग तिची सासू तिचा आणि तिच्या घरच्यांचा उद्धार करे.सासु -”काय ग, तुझ्या आईने तुला नवऱ्याशी सतत भांडायचंच शिकवलं आहे का, की तुझ्या आई वडिलांची भांडण बघूनच तू मोठी झाली आहेस? आम्हाला वाटलं चांगल्या मोठ्या घरची, शिकलेली मुलगी आहे म्हणून केली, पण ही बघा आमचं घर फोडायला निघाली. सतत नवऱ्याला म्हणते, ‘मला बाहेर घेऊन जा, माझ्यासोबत वेळ घालवा, माझ्याशी बोला,’ बायकोचा गुलाम आहे का माझा मुलगा? आणि त्याला इतका वेळ आहे का तुझ्या फालतू गप्पा ऐकायला.”
सासूची ही बोलणी ऐकली, की तिचा आणखीनच तीळपापड होई. नवरा बायकोंच्या प्रत्येक बाबतीत सासूने नाक खूपसल्याने त्या दोघांचं नातं बहरलच नाही.एकदा असंच नवरा बायकोचे भांडण विकोपाला गेलं आणि सासू तीला आणि तिच्या घरच्यांना घालून-पाडून बोलली आणि रागा-रागाने ती माहेरी गेली.पुढल्या भागात बघूया तिला घ्यायला तिचा नवरा सासरी जातो की नाही. तोपर्यंत हा भाग कसा वाटला नक्की सांगा ©® राखी भावसार भांडेकर नागपूर.सदर लिखाण संपूर्णतः काल्पनिक असून वास्तवात त्याचा कुणाशी कसलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून लेखिकेच्या परवानगीशिवाय कोणीही ते वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अंतिम भाग
नवरा -”आई तू मीनूला अजून किती दिवस घरातच बसून ठेवणार आहेस?सासू -”मला काय हौस आली आहे का तिला घरी बसून ठेवायची? तिच्या नवऱ्याने घेऊन जावे तिला. तुझी बहीण घरी आहे त्याचा तुला त्रास होतो आहे का? की बहिण जड झाली तुला आता?”नवरा -”काहीही काय बोलते आई? जरा विचार करून बोलत जा. माझी बहीण मला कशाला जड होईल? मी तिला आयुष्यभरही पोसू शकतो. आज मी मिनूचा नवरा रस्त्यात भेटला होता.”सासू -”काय म्हणत होता तो?”नवरा -”म्हणजे बघ, त्याचं म्हणणं आहे, की मीनूने तिच्या घरी जावं आणि स्वतःच्या घरची जबाबदारी घ्यावी.”सासू -”म्हणजे मीनूच्या नवऱ्याला काय वाटतं, की माझ्या मुलीने त्यांच्या घरी मोलकरीण बनून राहावं? त्याचे वडील अंथरुणाला खिळून आहेत, आणि मीनूची सासू प्रत्येक गोष्टी करीता सतत मीनूला हाका मारत असते, मीनूच्या सासूला तर पाणी सुद्धा हातात हवं असतं. आठवड्यातून एकही दिवस मीनूचा नवरा, मीनूला कुठे बाहेर नेत नाही, त्याचा स्वतःचा व्यवसाय इतका मोठा आहे, की त्याला दहा मिनिटंही मीनू सोबत बोलायला वेळ मिळत नाही. कधीच तिचं दोन शब्दांनी कौतुकही करत नाही तो. लग्न झाल्या झाल्याच मिनूच्या सासूने सगळ्या घराची जबाबदारी माझ्या लेकीवर टाकून दिली. असं कुठे असतं का? एवढ्या मोठ्या घराची जबाबदारी माझी लेक कशी घेईल?”नवरा -”कशी घेईल म्हणजे, जशी माझ्या बायकोने घेतली. ती पण मोठ्या घरातून आपल्या छोट्या घरात आली होती. माझ्या कर्तुत्वावर विश्वास ठेवून तिच्या वडिलांनी तिचं माझ्याशी लग्न लावून दिलं. पण मी मात्र तिची कधीच कुठली काळजी घेतली नाही आणि कुठल्याच गोष्टीचं कौतुकही केला नाही. माझ्या बायकोच्या घरी तर सगळ्या कामाला नोकर-चाकर होते, पण आपल्या घरी येऊन तिने धुणी-भांडी, झाडू, पोछा, स्वयंपाक सगळंच केलं ना! कधी कुठल्या कामाला तिने कधी नकार दिला आहे? तरीही तुझं काही समाधान होत नाही. तिच्या प्रत्येक कामात तू नेहमी खोडच काढत राहते.”सासू -”हे बघ माझ्यासमोर तुझ्या बायकोचं गुणगान काही करू नकोस, आणि कुठल्या कामात खोड काढली रे मी? लग्नाला पाच वर्ष झाली, तरी तिला कामाचा उरक नाही मग बोलू नको तर काय?”नवरा -”सकाळी सहाला माझ्या बायकोचा दिवस सुरू होतो तो रात्री अकरा वाजता संपतो. दिवसभरात दहा मिनिटांची सुद्धा विश्रांती घेऊ देत नाहीस तू तिला. एक काम संपलं की दुसरं, स्वयंपाक झाला की लगेच तू तिला फ्रिज पुसायला लावते, ट्रॉल्या पुसायला लावते, दळण-कांडण, भाज्या तोडणे ,कपड्यांना प्रेस करणे, अशी सगळी काम तू तिच्याकडून करून घेतेस. अगदी दोन वेळेला जेऊ घालतेस ना त्याचा पुरेपूर मोबदला तू तिच्याकडून काढून घेतेस.”
सासू -”हे बघ माझ्यासमोर तू काही तुझ्या बायकोचं कौतुक करू नकोस! तुला काय म्हणायचे ते स्पष्टपणे सांग. मीनूच्या नवऱ्याला जर वाटत असेल की मीनूने सासरी जावं तर त्यांनीं यावं आणि मीनूला घेऊन जावं.”नवरा -”आई कदाचित तू विसरली असशील, माझी बायको पण एकदा अशीच रागे भरून माहेरी निघून गेली होती, तेव्हा तू ही मला, तिला आणायला माझ्या सासरी जाऊ दिलं नव्हतं आणि कारण सांगितलं होतं, की जर मी एकदा तिला घ्यायला सासरी गेलो, तर ती वारंवार रुसून अशीच माहेरी निघून जाईल आणि मला वारंवार तिला घ्यायला माझ्या सासरी जावं लागेल, आता तोच नियम मीनूला लागू नाही होत का?” आणि काय ग मीनूलाच फार हौस होती ना, की आपल्याला चांगलं मोठं घरदार पाहून द्यावं, मग आता तिला मनाप्रमाणे मोठं घरदार मिळालं तर त्याची जबाबदारी घे म्हणा ना! आपल्या घरात तू माझ्या बायकोकडून सगळी काम करून घेतली, त्यामुळे मेनूला कामांची सवय लागली नाही आणि तीच गोष्ट आता सासरी तिला जड जाते आहे. आणि तूच म्हणते ना, की सासरी, सासू-सासर्यांची काळजी घेणं हे प्रत्येक सुनेच कर्तव्यच असतं मग हा नियम आता मीनूलाही लागू पडतो. मी उद्याच मीनूला तिच्या सासरी पोहोचवून येतो.”
उशिरा का होईना तिच्या नवऱ्याला स्वतःची चूक कळली होती आणि बायकोच्या कामांची जाणीव झाली होती.आपल्या आजूबाजूला अशा अनेक सासवा असतात की ज्या स्वतःच्या लेकीचे तर खूप लाड करतात पण घरी आलेल्या सुनेला मात्र मोलकरणी प्रमाणे राबवून घेतात. आपला तो बाळ्या दुसऱ्याचे ते कार्टं ही म्हण त्यांच्यावर अगदी चपखल बसते.©® राखी भावसार भांडेकर नागपूर.सदर लिखाण संपूर्णतः काल्पनिक असून वास्तवात त्याचा कुणाशी कसलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून लेखिकेच्या परवानगीशिवाय कोणीही ते वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.