त्रस्त गृहिणी भाग पाच
©® राखी भावसार भांडेकर नागपूर.
ऐका आदितवारा तुमची कहाणी….
आटपाट नगर होतं. तिथे एक त्रस्त गृहिणी राहत होती. ती सदा वैतागलेली होती. नवऱ्याशी कचाकचा भांडत होती. मुलांवर नेहमीच डाफरत होती. सासूच्या प्रत्येक टोमण्याला सडेतोड उत्तर देत होती. तिच्या आयुष्यात इतके संघर्ष असूनही, संसाराचा गाडा ती मोठ्या हिंमतीने पुढे रेटत होती. पण एकदा काय झालं! काहीतरी आक्रित घडलं. तिला जगणं असह्य झालं म्हणून मग तिने लिखाणाला जवळ केलं. चला तर जाणून घेऊया त्या गरीब बिचाऱ्या त्रस्त गृहिणीची मनाची व्यथा.
माझ्यासारख्या मध्यमवर्गीय, मध्यमवयीन गृहिणीचं दुःख कधीच कुणी समजून घेऊ शकत नाही. माणसाच्या आयुष्यात संघर्ष तरी किती असावा? आणि माझ्यासारख्या गरीब बिचाऱ्या पामारांनी आयुष्याची महत्त्वाची आणि उमेदीची किती वर्षे केवळ आज ना उद्या सारं काही ठीक होईल आणि ‘वो सुबह कभी तो आयेगी’ या आशेवर जगावित?
तर मैत्रिणींनो समस्त मध्यमवर्गीय चाकरमानी लोकांना आवडतो ना! तसा मलाही रविवार फार आवडतो. आठवडाभर मरमर काम करुन जीव मेटाकुटीला येतो आणि मग हक्काच्या, आठवडाभराचा श्रमपरिहार दूर करण्यासाठी, रोजच्या सहाच्या गजराला, एक दिवस का होईना आराम देण्यासाठीच जणू भगवंत, परमेश्वराने माझ्यासारख्या घर कामाच्या कष्टाच्या बोज्या खाली कंबर मोडून काम करणाऱ्या लोकांसाठीच रविवार नावाच्या स्वप्नातल्या सुखाच्या दिवसाची निर्मिती केली असावी.
पण एखाद्याचं नशीबच फुटकं असतं हो! रविवारच्या आळसावलेल्या सकाळी, कधी नव्हे ते जरा गादीवर लोळत पडावं तर, माझे चिरंजीव मम्मा मला भूक लागली किंवा पाॅटी आली असं म्हणून, माझ्या कानाशी कोकलतात. मनात नसूनही मनातल्या मनात स्वतःच्या नशिबाला बोल लावत, मी माझ्या बिछानाकडे अश्रू पूर्ण कटाक्ष टाकून कर्तव्यावर हजर होते.
माझा लेक महा नंबरी. आठवडाभर रोज सकाळी उठायला त्रास देणारा हा वांड मुलगा, बरोबर रविवार किंवा तत्सम सुट्टीच्या दिवशी अलबत सकाळी लवकर उठून बसतो. रोज सकाळी शाळेत जाण्याआधी त्याला खाण्यासाठी, दूध पिण्यासाठी कितीही आग्रह करा, त्याची कितीही मन धरणी करा पण हा बापू ढीम्म हलत नाही. सकाळी त्याला शाळेसाठी तयार करण्यासाठी उठवायला गेलं की, हा पठ्ठ्या बाबाच्या गळ्यात अजूनच गळे घालून, बाबाला अधिकच बिलगतो. तिकडे घड्याळाचा काटे गरागरा फिरत असतात, आणि मुलाच्या ह्या अशा वैतागवाडी वागण्याने माझे डोके गरगरायला लागते.
बरं माझा लेक लहान म्हणून त्याचं शाळेला जायला टाळाटाळ करणं, एक वेळ मी समजू शकते, पण माझी लेक ती तर मुलाच्याही वरताण वागते. दररोज सकाळी दर दहा मिनिटांनी तिला उठवायला, मला शयनकक्षाच्या वाऱ्या कराव्या लागतात. इतक्या वाऱ्या जर मी पंढरपूरच्या केल्या असत्या, तर नक्कीच तो पंढरीचा विठुराया मला पावला असता असा विचार त्यावेळी माझ्या मनात पटकन चमकून जातो. पण शाळेला होणारा वेळ लक्षात घेऊन मनातला तो विचार मी लगेच बाजूला सारून, लेकीला उठवायला परत तिच्या कानाशी ओरडते.
‘उठते ग!’ करता करता माझी लेक अर्धवट झोपेत “मम्मा दोन मिनिटं, पाच मिनिटं” असं म्हणत अर्धा तास उगाच वाया घालवते. माय-लेकींच्या आमच्या या वरच्या पट्टीतल्या संवादाने, नवऱ्याची झोप चाळवल्याने तो कानावर दोन उशा दाबून, गादीत तोंड खूपसुन झोपायचा अयशस्वी प्रयत्न करतो.
लेकीला उठवा उठवीच्या या गडबडीत कधी दूध उतू जाते, तर कधी पोळी जळते. त्या उतू जाण्याने आणि जळण्याने माझा मग जास्तच जळफळाट होतो. पण तो व्यक्त करायला मला अजिबात वेळ नसतो.
प्रत्येक सकाळी माझी आणि घड्याळाच्या काट्यांची शर्यत लागलेली असते. लेक एकदाची आंघोळीला गेली, कि ती न्हानी घरातून दर दोन मिनिटांनी माझ्या नावाचा पुकारा करते. “मम्मा टॉवेल दे, गणवेश दे, मोजे दे.” त्या क्षणी असं वाटतं एखादा धपाटा हिच्या पाठीत घालू दे, पण मी स्वतःला आवर घालते. लेकीचं शाही स्नान आटोपलं, की मी मुलाची त्याच्या बाबाच्या कुशीतून उचल बांगडी करून, सरळ आंघोळीच्या बादलीत त्याला विराजमान करते. माझा मुलगा तर दात घासण्यासाठी तोंड देखील उघडायला तयार नसतो. तिकडे आमची राजकन्या, वेणीला लावायचे ‘रिबन्स’ दिसत नाही म्हणून सगळं घर डोक्यावर घेते. सकाळच्या ह्या सगळ्या धामधुमीत घरातील कुणीच म्हणजे-नवरा आणि सासू, मला तोंडदेखली देखील मदत करायला तयार नसतात.
मुलाचं आवरून होत नाही, तोवर लेकीच्या “मम्मा टिफिन दिसत नाही, पाण्याच्या बाटलीचे झाकण सापडत नाही.” अशा आरोळ्या, किंकाळ्या, ढणाढणा माझ्या कामावर पडतात. मी एक क्षण देवघरातल्या देवाकडे बघते आणि एक क्षण आकाशाकडे. तोवर मुलगा ओळखपत्र मराठीत काय म्हणतात त्याला ‘आय कार्ड’ साठी बोंबलत असतो.
‘माझी वेणी अजून घालायची राहिली’ म्हणून भांडणाच्या अविर्भावात कमरेवर हात देऊन माझी रखुमाई माझ्या समोर उभी असते. खाली व्हॅनवाला, हॉर्न वाजवून मी आलोय अशी वर्दी द्यायला विसरत नाही. मुलगा ‘शु लेस’ बांधण्यासाठी माझ्या नावाचा पूकारा करतो. तर दोन वेण्यांसाठी मागचा भांग, आमचं कन्यारत्न मला चार वेळा पाडायला लावते. हे ही नसे थोडके म्हणून, वेणी सैल झाली, तर कधी समोर आली, कधी केस ओढल्या गेले, तर कधी समोरची वळणच बिघडली, असली फालतू सतराशे साठ कारण सांगून, मला ती तिची वेणी तब्बल दहा-बारा वेळा घालायला, सोडायला लावते. शेवटी साडेतेराव्या वेळी ‘वेणी जशी घातली आहे तशीच राहू दे, नाहीतर शाळेतच जाऊ नको.’ या माझ्या निर्वाणीच्या वाक्यावर ती धसमुसळेपणाने उठते आणि टेबलाचा कोपरा तिच्या बुद्धीहीन डोक्याला आलिंगन देतो. लेक परत एकदा सगळं घर डोक्यावर घेते.
तिची वेणी घालताना तिचं आणि माझं तुंबळ वाग् युद्ध सुरू असतं. एकमेकींसाठी जगाबाहेरच्या शब्दकोशातून आम्ही मायलेकी एक एक इरसाल शब्द शोधून काढून, परस्परांना शब्दबंबाळ करत असतो. तिकडे व्हॅन वाला हॉर्न वाजवून आम्हाला अधिकच चेव चढवत असतो. आम्हा माय लेकींची शाब्दिक चकमक येन भरात आलेली असतानाच, नेमका नवरा मध्ये कडमडतो आणि मनात नसताना, मला पांढरे निशाण फडकवून युद्धविराम घोषित करावा लागतो.
मुलगा मात्र केविलवाण्या नजरेने बुटाची लेस बांधायला मला विनवतो. मला परत एकदा तोंडाचा पट्टा चालवायची आयतीच संधी मिळते आणि इतर दैनंदिन दिवसाप्रमाणे माझी मुलगी, माझ्यावर दात ओठ खात, पाय आपटत आणि मुलगा रडवेला होऊन, ज्ञानार्जनासाठी शाळेकडे प्रस्थान करतात.
सकाळी मुलांना प्रेमाने, हसत टाटा करणारी आई आणि आईला गोड हसून बाय करणारी, शाळेला उत्साहाने जाणारी तिची मुले, हे चित्र केवळ टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्येच असावे असा माझा पक्का विश्वास आहे.
ता.शेरा -आदीतवाराची कहाणी माझ्या दैनंदिन जीवनातील एक दिवसाच्या किस्स्यावर येवून थांबली, असो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी वाचकांच्या दारी, लाईक कमेंट करणाऱ्यांच्या पारी सुफळ संपूर्ण.
©® राखी भावसार भांडेकर नागपूर.
सदर लिखाण संपूर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवात कुणाशी कुठलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.
सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून लेखिकेच्या परवानगीशिवाय कोणीही ते वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.