गुन्हेगार

“अहो ब्लड प्रेशर फार वाढलंय तुमचं, या वयात असा त्रास बरा नाही..तुमच्या कुटुंबात कुणाला त्रास आहे का बीपीचा?”

“नाही..”

“मग कसलं टेन्शन वगैरे आहे का??”

“डॉक्टर, मला गोळ्या लिहून द्या..”

मायाने विषय तिथेच टाळला..डॉक्टर मॅडमला समजुन गेलं की काहीतरी वैयक्तिक ताण तणाव असेल जो यांना सांगायचा नाहीये, डॉक्टरांनीही तिच्या वैयक्तिक बाबीत जास्त खोलवर न जाता गोळ्या लिहून तिला मोकळं केलं..

ती डॉक्टरकडून जाऊन मुलीला शाळेत घ्यायला गेली, शाळेत तिच्या शिक्षकांना मुलीबद्दल चौकशी केली,

“तुमची मुलगी अभ्यासात हुशार आहे, या पेपरमध्ये तिचे गुण थोडे कमी झालेत, मागे ती आजारी होती म्हणून असेल बहुतेक पण काळजीचं काही कारण नाही..”

“अहो असं कसं? कमी गुण असतील तर मला काहीतरी करायला हवं..तिला extra क्लास लावू का? की तुम्ही शाळेत घेणार काही extra??”

“अहो मॅडम इतकं टेन्शन का घेताय? लहान आहे ती, कमी गुण म्हणजे नेहमीपेक्षा 2-3 गुण कमी झालेत, फार काही नाही..”

शिक्षकांशी बोलून ती परत निघाली, वाटेत मुलीला चांगलीच बोलली..

“तू सध्या फार दुर्लक्ष करतेय अभ्यासाकडे, तू नीट अभ्यास कर….नाहीतर… माझ्यासारखं होईल तुझं..”

डोळ्यात पाणी आणून ती मुलीला सांगत होती, मुलगी पण समजूतदार होती..

“आई, काळजी करू नकोस, पुढच्या वेळी बघ कसे पैकीच्या पैकी गुण काढते मी..”

मुलगी असं म्हंटली तसं तिने मुलीला कवटाळलं आणि तिचे मुके घेतले…

“आई तू डॉक्टरकडे गेली होतीस ना? काय म्हणाले ते?”

“काही नाही, थोडा थकवा आहे म्हणून त्रास होतोय असं म्हणत होते..”

मुलीला तिने खोटं सांगून विषय बदलला…