गुन्हेगार 3 अंतिम

हे ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली,

त्या शाळेबद्दल तिला माहीत होती, काही राजकारण्यांनी मिळून ती शाळा फक्त दिखाव्यासाठी बांधली होती, तिथे शिक्षक नसायचे आणि अर्धे मुलं नसायचे, त्यांच्याकडे कामाला येणाऱ्या बायकांची मुलं तिथेच शिकत..आता त्यांच्याबरोबर आपल्या मुलीला पाठवायचं??

माया तिच्या खोलीत जाऊन रडू लागली..मुलगी जेव्हा अन्याय सहन न करण्याचा निर्णय घेते तेव्हा ती अजूनच जास्त गुन्हेगार ठरते हे सत्य तिला समजलं..

मुलीची चालू इयत्ता पूर्ण झाली, आता पुढच्या वर्गात प्रवेश घ्यायचा होता. तिचे आई वडील लक्ष घालत नव्हते. मुलगी वर्गात अव्वल आली त्याचा आनंद दोघींनी साजरा केला…

उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत्या.. मायाला तिच्या मैत्रिणीचा फोन आला,

“अगं तुला एका ठिकाणी बोलावलं आहे मुलाखतीला..माझ्या ओळखीतले आहेत..जा तू..”

माया ने मुलाखत दिली..तिची नोकरी सुरू झाली. नोकरीवर जाताना घरातली कामं ती करून जाई.. आई वडिलांचा नातीवर जीव होता, ते तिला सांभाळत, फक्त त्या दोघींसाठी खर्च करायचा म्हटला की कुवत असूनही ते हात आखडता घेत..

एका महिन्यात माया ने असं काम केलं की तिचे वरिष्ठ खुश झाले..त्यांनी तिला अजून जबाबदारीचे काम दिले, पगारही वाढवला..

सुट्ट्या संपल्या तश्या मायाची मुलगी शाळेची तयारी करू लागली,

मायाच्या आई वडिलांनी विचारलं,

“काय गं? त्याच शाळेत जातेय का पुन्हा? मग तो खर्च??”

“आई बाबा, तुम्ही काळजी करू नका, तिची पूर्ण फी मी भरली आहे..माझ्या लग्नाचा जो खर्च झालाय तोही तुम्हाला परत मिळाला आहे..आता यापुढे तुम्हाला आमचं ओझं नसेल..आम्ही शाळेजवळ एक फ्लॅट घेतलाय भाड्याने.. दोघीजणी तिथे राहू..पुढच्या आठवड्यात शिफ्ट होतोय..”

मुलीचा हा निर्णय ऐकताच आई वडील भानावर आले,

“अगं कुणी सांगितलं तुम्ही आम्हाला जड झालेत म्हणून? आई वडील असताना तुम्ही दोघी असं दुसऱ्या ठिकाणी राहणार?? हवं तर तुझ्या मुलीचं सगळं शिक्षण आम्ही करू आणि…”

“बस्स… आई बाबा बस्स…तुमचं मन एका ठिकाणी आमच्या प्रेमामुळे असं बोलत असलं तरी दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला ते जीवावर जातं.. तुम्ही प्रेमाने करत आहात तर दरवेळी बोलून माझं मन का दुखावता?? मी संसार टिकवला नाही याबाबत मलाच दोषी धरलं तुम्ही? मला वाटतं मी माझ्या सासरी जीवाचं काही बरं वाईट केलं असतं तर आज तुम्ही आत्तापेक्षा खुश असता.. लोकांसमोर बोलला असता की मुलीने परत यायला हवं होतं, आम्हाला सांगायला हवं होतं…पण आज मी तेच केलं असता तुम्ही मला जास्त गुन्हेगार ठरवताय… पण आता बस..मला छप्पर मिळालं हे खूप आहे माझ्यासाठी.. वाटलं तर भेटायला येत जा…”

असं म्हणत माया आणि तिच्या मुलीने निरोप घेतला…मायाची सासरी पाठवणी करतांना मायाच्या डोळ्यात पाणी होतं… पण आज ते पाणी डोळ्यात आलं नाही…कारण तिला कळून चुकलं होतं… सासर ना माहेर, आपलं कुणीच नसतं… आपलं आयुष्य आपल्याच हातात असतं… आपण आकार दिला तरच जगणं सुसह्य होतं…

समाप्त