गुन्हेगार-2

मुलीला घेऊन ती घरी आली..तिथून तिला परत एका मैत्रिणीला भेटायला जायचं होतं..तिची आई हॉल मधेच बसली होती..

“काय गं? इतका उशीर?”

“तिच्या शिक्षकांना भेटले होते..बरं आई मी अक्षराला भेटायला जातेय. जरा काम आहे माझं..”

“बरं लवकर ये..घरी येऊन स्वयंपाक करायचा आहे..”

आई असं म्हणाली आणि तिला परत वाईट वाटलं..लग्नाआधीची आई आणि लग्नानंतरची आई यात खूप तफावत होती, आई चिडचिडी झाली होती..

मायाच्या आयुष्यात मागील एका वर्षात प्रचंड वादळ उठलं होतं. तिचा नवरा आणि सासू मिळून तिचा प्रचंड छळ करत. ती सगळं निमूटपणे सहन करायची, पण किती काळ सहन करणार? तिने माहेरी सांगितलं.. तिचे आई वडील तिला घ्यायला आले ते कायमचेच…

माहेरी आल्यावर तिच्या जीवाला शांतता मिळाली, आपण आपल्या लोकांजवळ आहोत, आपल्या आई बाबांसोबत आहोत म्हणून काहीकाळ का असेना तिला दिलासा मिळाला होता.

पण ही दया फार काळ नव्हती, जसजसे दिवस जात होते तसतसं आई वडिल चिडचिड करत. बाकीच्या मुली बघ कसं सासरी सगळं सहन करतात, सासरी नांदतात, तुला एव्हढही सहन झालं नाही? तुला तुझा संसारही सांभाळता आला नाही?

आपला होणारा छळ बघून डोळ्यात पाणी आणणारे आई बाबा हेच का हा तिला प्रश्न पडला..

कोर्टात केस सुरू होती त्यांच्या घटस्फोटाची..अखेर त्यांना घटस्फोट मिळाला आणि काही पोटगी मिळाली. पोटगीचे पैसे तिच्या खात्यावर जमा झाले..त्याच दिवशी…

“बाबा, या पैशात आता मनुच्या शिक्षणाची सोय झाली, पुढे अजून पैसे लागतील, मी काहीतरी काम बघते..”

हे ऐकून आई बाबा एकमेकांकडे पाहू लागले…

“तुझ्या लग्नासाठी आमचे 10-15 लाख खर्च झालेत, कल्पना आहे तुला??”

हे ऐकून तिच्या काळजात एकच कळ उठली..आई बाबा आता लग्नाचा हिशोब मागत होते..लग्न टिकलं असतं तर? हे पैसे परत मागितले असते का??

“बरं ठीक आहे, ती रक्कम तुमच्याजवळ ठेवा..फक्त थोडेफार मला द्या, किमान ही इयत्ता पार पाडू देत..”

“ठीक आहे..एवढी इयत्ता पूर्ण कर..मग तिला इथल्याच विद्यामंदिर मध्ये टाकू.”