अहो आज कॉलनीत कार्यक्रम आहे, आपण जाऊया..जेवणही आहे त्यामुळे स्वयंपाकाचं टेन्शन नाही

माझी काही ईच्छा नाही, तुला जायचं तर जा.

अहो मग तुमच्यासाठी पुन्हा वेगळं काहितरी बनवावं लागेल, चला की..तेवढाच मला एक दिवस स्वयंपाकापासून आराम

त्यात कसला आराम, कितीसा वेळ लागतो? खिचडी टाकुन दे फक्त

(वैतागून) एक दिवस आराम म्हटलं तरी मिळणार नाहीच

वैतागू नकोस, थांब, आज मी करतो स्वयंपाक. काय वेळ लागतो..

तुम्ही?

हो, खिचडी टाकता येते मला.

मग मीही नाही जात कार्यक्रमात, तुमच्या हातची खिचडी खाईन

ग्रेट, चल आज खिचडी पार्टी

पण एका अटीवर

कोणती?

खिचडी टाकण्यापासून ते अगदी ओटा आवरून ठेवण्यापर्यंत सगळं करायचं, नुसती खिचडी टाकुन मोकळं व्हायचं नाही.

चालेल की, त्यात काय..कितीसा वेळ लागतो

(तो कामाला लागतो) अगं तांदूळ कुठेय?

वरच्या डब्यात

यात बरेच खडे दिसताय

हो मग, निवडावा लागेल

(तो ताटात घेऊन निवडून घेतो) डाळ कुठेय?

त्या बरणीत

तो डाळ तांदूळ घेऊन निवडतो, ताट बाजूला ठेवतो आणि कांदे, टमाटे, बटाटे कापायला घेतो.

कांदे फारच तिखट दिसताय, आग होतेय डोळ्यांची (तो कांदे चिरता चिरता बोलतो, 15 मिनिटं कापण्यात घालवतो)

कुकर कुठेय?

शोधा

(5 मिनिटं शोधाशोध केल्यानंतर तो गवसतो)

आता छान फोडणी देतो, तेल टाकलं..जिरं, मोहरी, कांदे, टमाटे, बटाटे टाकतो

खिचडीत कढीपत्ता, शेंगदाणे पण असतात बरं..

अरेच्या, विसरलो...कुठेय कढीपत्ता?

बाहेर जा, कढीपत्त्याचं झाड आहे तिथून पानं काढून आणा

(तो वैतागतो, गॅस बंद करून घेऊन येतो) तो: शेंगदाणे कुठेय?

आपण गावाकडून शेंगा आणल्या आहेत, तुम्हीच म्हणाला ना की शेंगदाणे वेगळे घ्यायची गरज नाही आता? आता शेंगा खुडा, शेंगदाणे काढा आणि टाका

(तो शेंगा खुडायला घेतो) तो: हुश्श, आता फोडणी देतो..कांदे, टमाटे, बटाटे, कढीपत्ता, शेंगदाणे, हळद, लाल मसाला, काळा मसाला, मीठ, डाळ तांदूळ शिजवले, आता पाणी टाकतो आणि झाकण लावून देतो (झाकण लावून तो एक सुस्कारा टाकतो आणि मोबाईल घेऊन सोफ्यावर बसतो, मोबाईल मध्ये फेसबुकवर असलेल्या व्हिडिओ मध्ये रममाण होतो)

अर्धा तास उलटतो, तो भानावर येतो. तो: किती शिट्ट्या झाल्या? मी मोजल्याच नाही, अरे देवा, खिचडी नक्की जळली असणार

मी केव्हाच गॅस बंद केलाय 2 शिट्ट्या झाल्यानंतर

बरं झालं

मी नसते तर? जळली असतीच ना..अट मोडली तुम्ही

एखादी अट माफ असते

बरं, चला वाढून आणा

आं?

आपली अट? एक चूक माफ असते, दुसरी नाही

बरं

(दोघेही जेवायला बसतात, खिचडी छान झालेली असते) ती: तूप असतं तर अजून चव वाढली असती

थांब घेऊन येतो

नागलीचा पापडही हवा होता, आणि लोणचं सुद्धा

तो: चिडून..आणतो (दोघेही जेवण संपवतात) तो: हुश्श, बघ बरं किती छान पार्टी झाली..कितीसा वेळ लागतो

(घड्याळाकडे बघत) होना, नेहमीपेक्षा 1 तास उशिरा जेवलोय

चला आता मी एक चक्कर मारून येतो आणि मस्त झोपतो

अट?

झालं ना आता सगळं?

आता हे सगळं आवरून कोण ठेवणार?

अरे यार..

बघा हं

(प्रचंड वैतागत) आवरतो बाई.. कांद्याची टरफलं उचलतो, स्वयंपाक करताना गॅस ओट्यावर प्रचंड पसारा केलेला असतो तो आवरतो..पन्नास वस्तू ओट्यावर काढून ठेवलेल्या असतात, त्या जागेवर ठेवता ठेवता दमछाक होते. मग ओटा पुसायला घेतो..कितीही पुसला तरी स्वच्छ दिसतच नव्हता

अहो कपडा तीन चार वेळा धुवून पिळून मग परत परत पुसत जा

@#$%%$

(तो रागारागाने जोर लावून पुसतो, ओटा स्वच्छ झाल्यावरचं समाधान सिंक मधली भांडी पाहून तात्काळ निवळतं...वैतागत, चिडत एकेक भांडी घासून ठेवतो...शेवटचं भांडं धुवून जवळजवळ आपटतोच.. फायनली सगळं झाल्यावर सोफ्यावर येऊन धाप टाकत अंग टाकून देतो)

बघा बरं, कितीसा वेळ लागतो..