एक श्रीमंत जोडपं, त्यांना एकुलता एक मुलगा. घरात सर्व सुखसोयी. मुलाचे हवे ते हट्ट पूर्ण केले जात होते.

Marathi Story - 1 : संस्कार 

वेगवेगळे क्लास लावून त्याला उत्तम शिक्षण दिलं गेलं. तो चांगले गुण मिळवत गेला. जोडप्याला आपल्या मुलाचा प्रचंड अभिमान, मुलाचं कौतुक करतांना ते थकत नसत.

त्यांच्याच शेजारी असंच एक जोडपं राहत होतं, पण ते गरीब होते. त्यांचा मुलगा, सतीश. अभ्यासात कच्चा होता पण वागायला अतिशय नम्र.

श्रीमंत जोडपं इतरांच्या मुलांना कायम पाण्यात बघत. आपल्या मुलापुढे दुसरा कुणीही श्रेष्ठ नाही हाच त्यांचा समज. हळूहळू मुलगा मोठा होऊ लागला, शिकायला परदेशी गेला.

त्यांच्या नातेवाईकांत परदेशी जाणारा तो एकटाच मुलगा होता. श्रीमंत जोडपं अगदी हवेत, मुलाच्या कौतुकाने त्यांनी गल्लीत पेढे वाटले.

इकडे सतीश एक छोटमोठा व्यवसाय करून तोही प्रगती करत होता. दिवस सरत गेले, श्रीमंत जोडप्याची दुखणी वर येऊ लागली. मुलाला फोन केला की नेमकंच बोलायचा तो. कामात असेल, व्यस्त असेल म्हणून आई वडील समजून घ्यायचे. भेटायला कधी येणार सारखं विचारायचे, पण तो काही यायचं नाव घेईना.

एके दिवशी त्याच्या वडिलांना हृदयाचा जोरात झटका आला, तोही रात्री 1 वाजता. आई घाबरली, फोन फिरवू लागली पण कुणीही उचलेना.

तेव्हा सतीश नुकताच उशिरा काम संपवून घरी परतत होता, त्याने आवाज ऐकला. त्याने पटकन जाऊन दार ठोठावले. आईने दरवाजा उघडला, रडत रडत सगळं सांगितलं.

सतीशने त्याच्या ओळखीने पटकन रुग्णवाहिका बोलावली, काकांना पटकन दवाखान्यात नेलं. आई मुलाला फोन फिरवत राहिली, पण मुलाने 2 दिवस फोन उचलला नाही.

सुदैवाने काका वाचले, त्याक्षणी त्यांना समजलं,

आपण मुलाला सर्व सुखं दिली, मोठं केलं. पण माणूस म्हणून आज सतीश सर्वात श्रीमंत ठरला. समाप्त