सूनबाईचा मित्र (भाग 10)

मोहन मागे पळत जातो, प्रभाच्या अंगावर काटाच येतो, बुजगावण्याच्या आत असलेली प्रभा जर मोहनला दिसली तर काय इज्जत राहणार होती तिची??

बुजगावनं घरात घुसून एका खोलीत दार बंद करून घेतं, मोहन बाहेरचं दार वाजवत असतो, प्रभाला आत काय करावं समजेना, ती पटकन तिच्या अंगणातल्या बुजगावण्याचे कपडे उतरवते, गादिखाली लपवून देते आणि जोरजोरात ओरडायला लागते..

मोहन बाहेर असतो, “प्रभा आत्याचा आवाज कसा आतून??”

प्रभा धापा टाकत दार उघडते, मोहन आश्चर्याने तिच्याकडे बघतो..

“अरे.. मोहन, बरं झालं आलास, बघ ना एक भूत माझ्या मागे लागलेलं.. हे बघ इथून खिडकीतून पळालं..”

“आत्या घाबरू नका, गावतलीच रिकामटेकडी पोरं आहेत ती, मी पकडतो त्याला…तुम्ही शांत व्हा..”

“बरं बाबा पकड त्यांना, काय घाबरले मी..किती आगाऊ आहेत ना ही पोरं??”

“जो कोण असेल ना त्याला बांबूचे फटके देईन मी..”

“नको नको नको नको..”

“काय झालं??”

“अरे..इतकं कशाला…नादान मुलं, सोडून दे..”.

“बरं आत्या ते जाऊद्या, खाली जा..श्रीधर आलाय..”

“अय्या हो का..भेटते त्याला..”

श्रीधर हॉल मध्ये असतो, प्रभा त्याच्यासमोर उभी राहते आणि त्याला म्हणते,

“काय रे…बरं चाललंय ना??”

प्रभाला पाहताच तो उभा राहून उत्तर देतो..

“अरे बस रे, मी काय इतकी मोठी आहे का मला मान द्यायला..आपल्या वयात फारसं अंतरही नसेल, मला प्रभाच म्हणत जा..”

“अहो नाही ओ, तुम्हाला नावाने कसं हाक मारू, तुम्ही इतक्या मोठ्या..”

“म्हणजे मी वयस्कर आहे असं म्हणायचं आहे का तुला??”

“तसं नाही ओ… पण ..”

“तुम्ही माझ्याहून वयाने..”

“म्हटलं ना फारसं अंतर नाही आपल्यात..”

“तरीपण ..तुम्हाला मानाने हाक..”

“मोठ्या माणसांना मान देतात, म्हणजे मी प्रौढ झालीये असं म्हणायचंय का तुला..”

“प्रभा…प्रभा…खुश??”

“हा..आत्ता कसं..”

“उशीरच झाला बाई तुला..”

“कशाला??”

“एक दोन दिवस उशिरा जन्म घेतला असतास, तर तुझ्याशिच लग्न केलं असतं मी..”

“बापरे, प्रभा अहो .”

“नाहीतर काय, तुझ्या इतका देखणा मुलगा मिळेल का कुठे..”

श्रीधर एकदम चूप..

“अरे गंमत करतेय रे..नाहीतर म्हणशील, श्वेताची सासू फार फ्लर्टी आहे म्हणून..”

“नाही नाही..गंमत…गंमत..”

“बरं तू सहज आलास का??”

“श्वेताला भेटायला..”

प्रभा एकदम खुश होते, दोघात प्रेम फुलतंय वाटतं असं तिला वाटू लागलं…श्वेता येते तशी प्रभा दोघांना एकांत म्हणून काहीतरी कारण काढून निघून जाते. घरातली मंडळीही शेतात कामाला गेलेली असतात, घरात रखमा कामवाली तेवढी असते आणि पिंट्या आलेला असतो सोबतीला..

“उत्तर सांगशील तुझं आज??”

“हो..”

“बोल मग..”

“खरं तर लहानपणापासून तुला बघत आलोय, आयुष्यात खूप मुली आल्या, पण तू एकच अशी होतीस जी हृदयाच्या खूप जवळ होती, वाटायचं आयुष्यभर तुझी सोबत असावी, पण तू निघून गेलीस अन मला इतर कुणाशीही प्रेम जडलं नाही, घरच्यांनी खूप स्थळं दाखवली, पण प्रत्येक चेहऱ्यात तुझंच रूप शोधत बसायचो अन ते सापडायचं नाही..आपलं भविष्य काय आहे हे मला माहित नाही, पण आज तुझ्यासमोर मी कबुल करतो की माझं तुझ्यावर मनापासून प्रेम होतं, आहे, आणि राहील..”

श्वेताला ते ऐकून डोळ्यात पाणी येतं, क्षणभर तिला वाटतं की हे सगळं तिच्यासाठीच आहे, पण ती भानावर येते, तिच्या माहितीप्रमाणे हे उत्तर श्रीधरने क्रांतीसाठी दिलं होतं..ती काहीही न बोलता तडक आपल्या खोलीत जाते अन दार लावून घेते..खूप रडते, अगदी मनापासून सगळं मोकळं करते..क्रांती साठी श्रीधरला असलेलं हे प्रेम तिला सहनच होत नव्हतं, आजवर श्रीधरला असं दुसऱ्या मुलीसोबत पाहिलं नव्हतं, त्याच्या आयुष्यात केवळ एकच मुलगी होती आणि ती म्हणजे श्वेता, क्रांती बालपणीची मैत्रीण होती पण श्रीधरच्या इतक्या जवळ नव्हती. श्वेता क्षणात रडायची, क्षणात भानावर यायची..तिच्या मनाची प्रचंड घालमेल चाललेली.

इतक्यात क्रांती येते,

“श्वेता, त्याने दिलं उत्तर??”

“होय…”

“काय म्हणाला तो??”

“तो म्हणाला की…त्याचं. .दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे..”

“काय?? कोण आहे ती??”

“मला नाही माहीत, आता नाद सोडून दे त्याचा. “

“नाही..श्रीधर माझा जीव की प्राण आहे, त्याच्याशिवाय दुसऱ्या कुणाशी लग्न करणार नाही मी, कोण आहे ती मुलगी? तिच्यापासून तोडून आणेल मी त्याला..”

“ते शक्य नाही, ती मुलगी त्याच्या श्वासा श्वासात आहे..तो आणि ती एकरूप आहेत…त्यांना वेगळं करणं कधीच शक्य नाही…राधा कृष्णा सारखं निर्व्याज प्रेम आहे त्यांचं.. एकमेकांसोबत नाही, तरी एकमेकांत मिसळलेले…शरीराने वेगळे, पण मनाने एकरूप झालेले .”

“तुला बरंच माहीत आहे म्हणजे, ती मुलगीही माहीतच असेल..”

श्वेता आरशासमोर जाऊन उभी राहते,

“कदाचित समोरच असेल, पण तुला दिसली नसेल कदाचित..”

“नाही, मी हे होऊ देणार नाही..”क्रांती पाय आपटत निघून जाते.

श्वेता विचार करत बसते, आपण हिला खोटं सांगून चूक तर केली नाही ना? हो मी मान्य करते, माझं श्रीधर वर खूप प्रेम आहे, पण म्हणून …आणि माझ्यासारख्या विवाहित स्त्रीने असं करावं?? शी ..मला माझीच लाज वाटतेय…
क्रांती यावेळी काहीही पत्र देत नाही, पण श्रीधर दुसऱ्या दिवशी पुन्हा येतो उत्तर ऐकायला…

यावेळी श्वेता त्याच्या समोर जाते,हातात पत्र नसतं…., श्रीधरला सांगते..

“तुझ्यावर असलेलं माझं प्रेम हे..म्हणजे..कसं सांगू तुला आता…”

“श्वेता???? लाज वाटते का तुला??

समोर अचानक केदार येऊन उभा राहिलेला असतो.केदारला पाहून श्वेताला प्रचंड धक्का बसतो. ती उठून उभी राहते, तिला घाम फुटलेला असतो. केदारला आता राहायची सोय कुठेच नसल्याने तो इकडे आला होता, त्याच्या सासरी त्याची थेरं माहीत नसणार याची त्याला खात्री होती.

“अहो…हे मी नाही.. ती माझी मैत्रिण..”

“अहो जावईबापू? कधी आलात? कळवायचं तरी…अगं मंगला… पाणी आण बघू…”

केदारचं साग्रसंगीत सगळं केलं जातं, केदारही मनसोक्त सगळी सेवा करून घेत होता. पण श्वेता आतून घाबरली होती, रात्री जेव्हा केदार खोलीत येईल तेव्हा काय उत्तर देऊ त्याला??

मोहन केदारला बघून त्याला तिथेच दोन कानाखाली वाजवाव्या असं त्याला वाटलं, पण पिंट्याच्या आजीने त्याचा हात मागे ओढला..

श्रीधर केदारला पाहून एकदम बदलून जातो. इतके दिवस प्रेमाच्या स्वप्नात रंगून जाणाऱ्या श्रीधरला आता सत्य बोचू लागतं. कितीही झालं तरी श्वेता आपल्याला मिळणार नाही याचा स्वीकार करायला तो शिकू लागला.

रात्री केदार उशिरा घरी येतो, श्वेताच्या खोलीतच त्याचं समान ठेवलेलं असतं. त्याच्या तोंडाला दारूचा वास येत असतो. त्याला पाहून श्वेता घाबरते..

“काय गं?? इकडे येऊन लफडे सुरू केलेत काय..”

“अहो ऐका.. माझी मैत्रीण आहे ना क्रांती म्हणून, तिला त्याच्याशी लग्न करायचं आहे, त्यांची पत्र माझ्याकडून एकमेकांना वाचून दाखवली जातात..”

श्वेता एका दमात सगळं सांगून टाकते..

“असंय का…मग ठिके…”

श्वेता सुटकेचा निश्वास टाकते. प्रभा तर केदारला बघायलाही तयार नसते, तो आला तरी त्याला एक तर हकलता येत नव्हतं आणि श्वेताच्या घरी सत्य सांगताही येत नव्हतं.

केदार येताच श्रीधरचं घरी येणं बंद होऊ लागतं. श्वेताला तो केदार सोबत बघूच शकत नव्हता..श्वेताला हुरहूर लागलेली..पण केदार सोबत आहे तोवर श्रीधरला भेटणंही शक्य नव्हतं.

एके दिवशी केदार दुपारी फिरत फिरत मधल्या शेतात गेला, श्रीधर तिथेच उभा होता.

“नमस्कार.. ओळखलं का मला..”

श्रीधर केदारला असं अचानक आलेलं पाहून दचकतो..

“या ना…इकडे कसे आज?”

“माझी सासुरवाडी आहे, केव्हाही येईन मी..तू कसा इथे??”

“मीही इथेच जवळ राहतो…इंजिनिअरिंग केलंय, आता स्वतःचं संशोधन केंद्र आहे..”

इतका वेळ तोऱ्यात बोलणाऱ्या केदारचा अहंकार काहीसा निवळला,

“काय तुम्ही इथे गावात मर मर करताय..तिकडे शहरात चला..”

“हो..बघू..”

“आणि हो, मुलगीही शहरातलीच कर हा..”

“का?”

“गावाकडच्या मुली, धड मिरवता येत नाही आणि धड सोडताही येत नाही..”

“म्हणायचं काय आहे तुम्हाला??”

“माझी बायकोच बघा ना, मिरवण्यासारखी आहे?? लाज वाटते मला तिची.. असं वाटतं दुसरी मुलगी केली असती तर..”.

हे ऐकून श्रीधर संतापला..

“श्वेताबद्दल असं कसं बोलू शकता तुम्ही?? काय कमी आहे तिच्यात? अहो नशीबवान आहात तुम्ही..”

“कसलं नशीबवान… नशीबवान असतो तर लग्नानंतर बाहेर लफडी केली नसती..” केदार अगदी निर्लज्जपणे सांगून टाकतो. मोहनकडून श्रीधरला उडत उडत खबर आलेलीच असते, पण आज खात्री होऊन जाते. तिथेच मोहनचे वडील येतात,

“केदार पाहुणे, आपल्याला गावातल्या मंदिरात जायचं आहे, फार प्रसिद्ध मंदिर आहे…तुम्ही आला आहात तर चला जोडीने दर्शन करून घ्या..”

“ठिके..असही फार बोर होतंय इकडे..”

“श्रीधर चल की तुही सोबत..”

“मी??”

“हो…चल ना, मलाही सोबत..”

सर्वजण गाडीत बसून मंदिराकडे निघतात, गाडीत श्रीधर पुढच्या सीटवर बसलेला असतो, मागे केदार आणि श्वेता असतात. श्वेता आरश्यातून श्रीधरकडे एक नजर टाकते..पण त्याचं लक्ष नसतं.. त्याच्या डोळ्यातले भाव श्वेताला समजून येतात.

मंदिराजवळ येताच दर्शनाला सर्वजण रांग लावतात..तिथे एक आजोबा सांगतात, जोडीने जे या देवाचं दर्शन घेतात, ती जोडी कायम शेवटपर्यंत एकत्र आणि सुखी राहते…

रांग पुढे सरकते, श्वेता आणि केदार शेजारी उभे असतात, मागे श्रीधर असतो. देवासमोर येताच केदारच्या पायाला काटा तोचतो आणि तो कळवळत एक पाय वर घेऊन बाजूला जाऊन उभा राहतो..गर्दी असल्याने मागून धक्का लागतो अन श्रीधर श्वेताच्या बाजूला उभा राहतो..गुरुजी म्हणतात, दोघांनी पटापट नमस्कार करा अन सरका पटकन..दोघेही नमस्कार करतात, गुरुजी हातात प्रसाद देऊन म्हणतात,

“तुमची जोडी अशीच साता जन्म सोबत राहू देत..”

क्रमशः

Leave a Comment