कनिका छानपैकी तयार होऊन बसली होती. तयारीच्या बाबतीत तिची बरोबरी कुणीच करू शकत नसे. मॅचिंग बांगड्या, कानातले, हार इथपासून ते सँडल पर्यंत तिच्याकडे कलेक्शन होतं. कामानिमित्त मोहनला अनेक कार्यक्रमांना हजेरी लावावी लागे, आणि तेही कनिका सोबत. त्यामुळे कनिका छानच राहायला हवी आणि सर्वांमध्ये उठून दिसायला हवी असा त्याचा आग्रह असायचा. कनिकालाही ते आवडे, ती स्वतःवर प्रेम करायला शिकली होती. स्वतःच्या विश्वात गुंग असायची. चार लोकांनी तिचं कौतुक केलं की खुश व्हायची.
तिने स्वतःला आनंदी बनवण्यासाठी वेगवेगळे मार्ग निवडले होते. छान राहायचं, लोकांशी छान बोलायचं, लोकसंग्रह वाढवायचा..लोकांसोबत वेळ घालवायला तिला आवडे. खूप गप्पा मारायची ती, अगदी अनोळखी व्यक्ती असेल तरी पटकन ओळख करून घ्यायची. कारण घरात मोहन ला वेळ नसायचा, कामपूरतं जेवढं लागेल तेवढंच तो बोलत असे. तिच्याकडे सगळं होतं, पण नवरा म्हणून जे प्रेम आणि जिव्हाळा अपेक्षित होता तो काहीसा कमी होता एवढंच.
कार्यक्रमात गेल्यानंतर सर्वांच्या नजरा कनिकावर खिळल्या होत्या. सुंदरच इतकी दिसत होती ती! इकडे मोहनही खुश. मिजाशीत सगळीकडे “ही माझी बायको” म्हणून मिरवत होता.
या कार्यक्रमात जोड्यांसाठी एक खेळ घेतला जात होता. अनेक जोड्या समोर येऊन छानपैकी खेळाचा आनंद घेत होते. कनिका आणि मोहनला मित्रांनी आग्रह केला आणि दोघेही स्टेजवर गेले.
खेळ असा होता की दोघे नवरा बायको शेजारी शेजारी बसतील. दोघांना एका कागदावर काही प्रश्नांची उत्तरं लिहायला लावली. दोघांनी कागद सूत्रसंचालक कडे दिला. प्रश्न सुरू झाले.
“पहिला प्रश्न कनिका मॅडम साठी, मोहन सरांची आवडती डिश कोणती?”
“गुलाबजाम”
सूत्रसंचालक कागदात बघतो, मोहनने हीच डिश लिहिली होती.
“अभिनंदन… बरोबर उत्तर..आता सांगा, मोहन सरांचा आवडता सिनेमा”
“3 idiots”
“अगदी बरोबर.. टाळ्या. मोहन सरांचा एक चांगला गुण”
“वक्तशीरपणा”
“अभिनंदन, सर्व प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली आहेत. आता मोहन सर, तुमची बारी.. कनिका मॅम चा आवडता पदार्थ”
“गुलाबजाम… मला आवडतो तसा तिलाही आवडतो”
“चूक..त्यांचा आवडता पदार्थ आहे समोसा”
हे ऐकून मोहनला आश्चर्य वाटलं, गेल्या कित्येक महिन्यात समोसा खाल्ला नव्हता..माझ्यासाठी केलेले गुलाबजाम मात्र कनिका आवडीने खायची…
“कनिका मॅडमचा आवडता रंग..”
“गुलाबी..तो रंग छान दिसतो म्हणून घराचा आणि फर्निचरचा रंगही तोच आहे”
“चूक…मॅडमला लाल रंग आवडतो”
म्हणजे गुलाबी रंग ही माझी चॉईस होती, आणि कनिका फक्त हो ला हो करायची आजवर? मोहन अंतर्मुख झाला होता.
“शेवटचा प्रश्न, कनिका मॅडमचे आवडते ठिकाण”
“केरळ…”
“चूक..महाबळेश्वर..सर्व उत्तरं चुकली आहेत”
समोरची माणसं गमतीत बघत होती आणि हसत होती. त्यात कनिकाही सामील झालेली. पण मोहनला आज फार मोठा धक्का बसलेला. आज पहिल्यांदा या खेळाच्या निमित्ताने तो अंतर्मुख झाला..
“कित्येक वर्षे आम्ही सोबत राहतोय..कधी तिला जाणून घ्यायचा प्रयत्न का केला नाही मी? माझी आवड तिच्यावर लादली, तिच्या आवडीचा विचार कधी केलाच नाही..मला जे आवडतं त्यालाच तिने स्वतःची आवड बनवली..तिचं स्वतंत्र अस्तिव असं ठेवलच नाही..तिच्या आवडीनवडी मला आज समजल्या, इतक्या वर्षांनंतर.. तेही या अश्या कार्यक्रमामुळे, नाहीतर कधी जाणून घेतल्या असत्या मी?”
खेळ संपला, सर्वजण पार्टी एन्जॉय करू लागले.. पार्टी झाली आणि सर्वजण घरी परतले. कनिकाच्या चेहऱ्यावर जराही काही भाव नव्हता, आपल्या नवऱ्याला आपल्या आवडीनिवडी माहीत नाही याबद्दल तिला जराही खंत नव्हती.
संसाराच्या खेळात कनिका जिंकली होती, पण मोहन मात्र हरला होता.
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?