भातुकली-2

 सुनबाईसुद्धा स्वैपाकात तरबेज होती, 

शिक्षण फारसं नव्हतं त्यामुळे नोकरीचा प्रश्न नव्हता,

आता ही आपल्याला मदत करेल,

आपलं नाव, आपला व्यवसाय पुढे नेईल अशी त्यांची अपेक्षा होती,

सुरवातीला ती करायची मदत,

पण हळूहळू काय झालं देव जाणे,

तिचं कामावरून लक्ष उडू लागलं,

स्वैपाकात, किचनमध्ये ती फारसा रस घेत नसे,

लागलं तेवढं फक्त बनवायची,

सासूबाईंना राग यायचा, काळजी पण वाटायची,

पण हळुहळु होईल सगळं नीट, असं म्हणत त्या वाट पहायच्या,

या काळात एक गोड नात त्यांच्या पदरी पडली, 

त्या दिवशी सुनीताबाई पापडं घ्यायला आल्या तेव्हा स्वैपाकघरातून त्यांना भाजी करपल्याचा वास येऊ लागला,

सासूबाईंच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी पटकन जाऊन गॅस बंद केला,

सुनबाई मोठा गॅस करून गच्चीवर कपडे सुकवायला निघून गेलेली,

सुनीताबाई झटकन बोलून गेल्या,

“सूनबाईची बोंबच दिसते”

सासूबाईंनी सुनेची बाजू घेत म्हटलं,

“अहो तिने मला लक्ष ठेवायला सांगितलेलं, पण माझ्याच लक्षात राहिलं नाही”

पण मनातून खरंच राग आलेला त्यांना,

त्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर झाला,

दोघींमध्ये शाब्दिक चकमकी होऊ लागल्या,

घरातलं वातावरण बिघडत होतं,

सासऱ्यांचा हे लक्षात आलं,

कुठे बिनसलं हेही त्यांना समजलं,

एके दिवशी त्यांनी आपल्या नातीला सोबत घेतलं,

तिला भातुकलीमधली खेळणी आणून दिली,

बायकोलाही बोलावलं, आणि म्हणाले,

“आज नातीसोबत भातुकली खेळ”

सासुबाई गोड हसल्या,

“लहानपणीचा भातुकलीचा खेळ संसारात कधी बदलला कळलाच नाही”

छोटीशी नात बोबड्या भाषेत बोलू लागली,

“आता मी भाकरी बनवणार, तू पाणी घे”

असं म्हणत तिने एक छोटंसं पातेलं घेतलं,

सासुबाई म्हणाल्या,

“अगं ही परात घे भाकरी करायला, पातेल्यात कशी करणार”

पण नात अडून बसली, ऐकेना..सासूबाईंनी शेवटी कौतुकाने “बरं बाई, कर..” म्हटलं,

सासरे हसत होते,

“तुम्हाला काय झालं हसायला?”

“बाईची जात कशी असते पाहिलं ना?”

“हो ना, शिकवलं नाही तरी भाकरी थापायला, लोकांना खाऊ घालायला आवडतं मुलीच्या जातीला..”

“अजून एक गुण, जो तुला दिसलाच नाही..”

“कोणता?”

“बाईच्या वाटेला संसारातील फारश्या गोष्टी येत नाहीत, तेवढं स्वैपाकघर मात्र तिच्या ताब्यात असतं, तिला ते तिच्या पद्धतीने सजवायचं असतं, तिच्या आवडीने मांडायचं असतं”

“ते तर स्वाभाविकच आहे”

“कळतंय ना तुला? मग वळत कसं नाही?”

इतक्या वेळ खेळीमेळीचे असलेले सासूबाईंचे हावभाव एकदम बदलले,

सासऱ्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली,

“आठव, आपण शहरात आलो, नव्याने संसार सुरवात केला. तो जुनाच काळ, सुरवातीला माझा धाक असायचा तुला.माझं सगळं ऐकायचीस तू, पण किचनमध्ये मात्र माझं काहीएक चालू द्यायची नाहीस. तिथली वस्तू इकडची तिकडे केलेली तुला आवडत नसायची. तेवढाच काय तो एक तुझा अधिकार असायचा.”

“मग वळत नाही असं का म्हणालात?”

“सुनबाई घरात आली, तिलाही आवड होती तिच्या आवडीने स्वयंपाकघर सजवायची, रचायची..तिने काही नवीन वस्तू आणल्या, नवीन बदल केले. पण ते बघून तू नाक मुरडायचीस, हे असं कशाला, ते तिथे कशाला ठेवलं म्हणत तू सगळं आधीसारखच ठेवायला बघायचीस. पदार्थ बनवतानाही अमुक असंच बनलं पाहिजे, तमुक एकच पदार्थ शिजायला हवा असा तुझा हट्ट. सुनबाई सगळं छान करत होती, पण त्या “बाईपणाच्या अधिकाराचा” तुकडा तिच्या वाट्याला आलाच नाही. आपण नवीन लग्न झालं तेव्हा तुझ्या स्वैपाकघरात लुडबुड करायला कुणी नसायचं, तू तुझ्या छोट्या छोट्या रचना सांभाळून होतीस. पण सूनबाईला तो अधिकार कधी मिळालाच नाही.”

****

भाग 3

https://irablogging.in/?p=17

2 thoughts on “भातुकली-2”

Leave a Comment