“अमित अरे येतोय ना घरी? जेवायची वाट बघतोय आम्ही..”
“अगं थांब बॉस च्या परवानगी साठी थांबलोय, मिटिंग मध्ये आहे तो..”
“अरे देवा..अजून परवानगी मागायची बाकिये??”
“हो..हवं तर तुम्ही जेऊन घ्या.”
“नको, आम्ही वाट बघतो.. “
“बरं..”
अमितच्या घरी आज पुरणपोळीचं जेवण होतं. संक्रांतीची सुट्टी कंपनीने काही दिली नव्हती, डबा न नेता दुपारी जेवायला घरीच जायचं असा अमितचा प्लॅन होता. पण आज ऑफिसमध्ये जरा जास्तच धावपळ होती. बॉस एका महत्त्वाच्या डील मध्ये अडकला होता, त्यात बऱ्याच अडचणी आल्याने सर्व कर्मचाऱ्यांना त्याने धारेवर धरलं होतं. अश्या परिस्थितीत अर्धी सुट्टी मागायला जाणं म्हणजे वाघाच्या तोंडात हात देण्यासारखं होतं. पण पोटात कावळे ओरडत होते, पुरणपोळी डोळ्यासमोर दिसत होती. धीर करून अमित बॉस च्या केबिन बाहेर उभा राहिला आणि दार ठोठावले.
“आत या..”
“सर..”
“बरं झालं तुम्ही आलात, ही फाईल घ्या, यातले सगळे रेकॉर्ड मला excel शीट मध्ये भरून द्या..अर्जंट..”
“ठीक आहे सर..” अमित नाराजीनेच म्हणाला..तो दरवाजाजवळ जाताच बॉस म्हणाला..
“बाकी काही काम होतं का तुम्हाला??”
“सर..ते आज मला half day..”
“परिस्थिती काय, टेन्शन काय अन तुम्हाला घरी जायचंय??”
“सॉरी सर..मी करतो फाईल पूर्ण..”
बॉस परवानगी देणार नाही खात्री होतीच.
दुपारचा 1 वाजला. अमित घरी आला, आल्या आल्या हात धुतले अन जेवायला बसला..
“आई वाढ पटापट..”
“हो हो. बरं झालं आलास..चेतन, कीर्ती..चला बसा जेवायला..”
पुरणपोळी चा एक घास तोंडात टाकताच अमितच्या जिभेवर चव रेंगाळत राहिली..आधाश्यासारखा तो जेऊ लागला..
“अरे हळू..आणि बरं झालं बॉस ने परवानगी दिली ते..”
“काय सांगू अगं… मला तर त्याने एक काम दिलं आणि पूर्ण करायला लावलं. मी half day चं विचारलं तेव्हा सरळ नकार दिला. मग मी तोंड पाडून उपाशीपोटी काम करत बसलो तेव्हा तो हळूच जवळ आला आणि मला घरी यायची परवानगी दिली त्याने..”
“भला माणूस म्हणायचा..”
“होना.. मला तर वाटलेलं आज ऐकणारच नाही तो..”
“ऐकणार नाही तर काय करेल.. तुम्ही कामं करतात म्हणून तो तिथे निवांत बसू शकतो..आपल्या हाताखालच्या लोकांची काळजी घेणं त्यांचं कर्तव्यच आहे..”
जेवण आटोपून अमित ढेकर देतो. चांगलीच सुस्ती आलेली असते. 10 मिनिटं खोलीत जाऊन पडू अन मग कंपनीत जाऊ असं त्याने ठरवलं. खोलीत जाताच त्याने पाहिलं, काल फाईल मध्ये लावायच्या पेपर्स ला पंचिंग करताना झालेला कचरा तसाच होता.
“आई..आज कमला आलेली नाही का??”
“आलीये..भांडे घासतेय..”
“खोली झाडलेली नाहीये..”
“कमला..आधी खोली झाडून पुसून घे बाई..मग भांडी कर..आज भांडी जरा जास्तच निघाली नाही का..”
“ताई..आज घरी पाहुणे आलेत..खुप वर्षांनी आलेत.. मला जाऊद्या ना, ते गेले की परत येईन झाडू फरशीला..”
“नको गं बाई..पाहुण्यांना माहीत नाही का कामाला येतेय ते? असं काम सोडून अर्धवट जात येतं होय कधी?”
कमला नाराज होऊन झाडू हातात घेते..
“हॅलो..सर येतोय लगेच..झालं माझं..”
अमित घाईघाईने पुन्हा बाहेर पडतो..आई अमितकडे एकदा बघते, कमला कडे एक कटाक्ष टाकते..मनात काहीतरी चलबिचल होते अन हळूच कमला जवळ जाऊन म्हणते..
“चल जा घरी, जाऊन ये लवकर..झाडू फरशी कर नंतर..”
कमला अवाक होऊन बघतच राहते..घाईघाईत गाडी काढणारा अमित कमलाला घरी जातांना पाहून मनातल्या मनात हसतो अन स्वतःशीच म्हणतो..
“दुनिया गोल है सहाब..”
खूप सुंदर