अहंकार त्याचा…

“इतकाही अहंकार चांगला नाही…एक दिवस तुझा हाच अहंकार तुला संपवेल…”
राधिका नेहमी त्याला म्हणायची…
आदेश आणि राधिकाचा प्रेमविवाह, एकाच कॉलेज मध्ये शिकणारे दोघे…अभ्यासात दोघांची चढाओढ…राधिकाही जबरदस्त स्कॉलर…दोघांची अभ्यासातही स्पर्धा…आदेश तिला मागे टाकण्यात आनंद मानायचा.. आणि राधिकाचा हरण्यातही आनंद मिळायचा..कारण त्याच्या चेहऱ्यावर चा आनंदच तिला खूप होता…
लग्न झालं, पण त्याचा अहंकार तिला आता त्रास देऊ लागला…”माझ्यामुळे सगळं आहे, मीच सर्वेसर्वा आहे…” मित्रांमध्ये फुशारक्या आणि बायकोला सतत कमी लेखायला तो मागेपुढे पाहायचा नाही. राधिका सारख्या हुशार मुलीलाही मागे पाडलं, सॉफ्टवेअर चा बिझनेस सुरू करून मी एक उंची गाठली…याचा त्याला अहंकार…
त्याच्या यशात अर्धा वाटा राधिका चा होता, पण तो स्वतःलाच त्या यशाचा मानकरी बनवत होता…
एकदा कॉलेज ची मित्रमंडळी घरी आली,
“कौतुक आहे हा तुझं आम्हाला, स्वतःची कंपनी काढून इतकी मोठी केलीस, आणि राधिका सारखी बायको मिळाली तुला, तिने हातभार लावला..त्यामुळे तुझ्या बिझनेस ला गती मिळाली…” मित्र दोघांचेही कौतुक करत होते, कारण त्यांना राधिका च्या कर्तृत्वावर विश्वास होता, तिची हुशारी त्यांनी जवळून अनुभवली होती…
“तिने काय केलं त्यात?? मीच सगळं सांभाळलं.. तिने फक्त घर सांभाळलं…तिला काय समजतं बिझनेस मधलं…”
“असं काय बोलतोय आदेश? अरे आम्हीही तुझ्यासोबतच शिकलो, आम्हालाही माहितीये राधिका चं कौशल्य, तिने कॉलेज च्या वेळी जो प्रोजेक्ट बनवलेला त्याला नेशनल लेव्हल ला प्राइझ मिळालं, आणि आता तू त्याच आधारावर बिझनेस चालवतोय, आम्हाला काही कळत नाही का…”
आदेश च्या अहंकाराला ठेस पोहोचली, त्याला कॉलेज मधले दिवस आठवले, राधिका च्या प्रोजेक्ट समोर त्याचा प्रोजेक्ट फिका पडलेला…त्या पराभवाची सल त्याला अजूनही बोचत होती…
“मीच तिला ते बनवून दिलेलं…नाहीतर तिला काय येत होतं…”
राधिका आता रागाने लाल झाली, किती खोटं बोलतोय हा माणूस? सर्वांच्या समोर जाऊन तिला बोलता आलं असतं, पण नवऱ्याचा मान तिने जपला आणि ती शांत राहिली…
मित्र निघून गेले, राधिका आदेश समोर आली आणि म्हणाली..
“तू तुझ्या अहंकारापायी वाटेल ते बोलतोयस…आणि आज तर चक्क माझ्या बुद्धीवर प्रश्नचिन्ह उभं केलंस? मीही आहे तुझ्याइतकी कर्तृत्ववान, पण प्रेमात हार जित नसते रे, स्पर्धा नसते…त्यात कोणी मोठा नसतो आणि कोणी छोटा नसतो…समर्पण असतं..जे मी करत आले…पण आता बस्स… तुला स्पर्धाच हवीय ना? तुला जिंकायचं आहे ना? चल मग, मीही उतरते यात…मी स्वतःचं वेगळं स्टार्टअप सुरू करते, बघूया, कोणाचा बिझनेस जिंकतो ते…”
आदेश कुत्सित हसत म्हणाला,
“अगं स्पर्धा करायला तोडीस तोड प्रतिस्पर्धी लागतो, तुला माहितीये तू हरणारच आहेस तर मग का स्वतःचा अपमान करून घेतेस??”
“घाबरताय??”
“मी? तुला घाबरले?? काय बोलतेयस… बरं तुला एवढीच हौस आहे ना? मग आता होऊनच जाऊदे…मी आता तयारी करतोय या वर्षीच्या ‘बेस्ट स्टार्टअप अवॉर्ड’ साठी…आणि तू काय करशील?? फक्त एक सुरवात..तीही निष्फळ…”
“तुझा अहंकारच तुला खाईल रे…बघशील तू…”
असं म्हणत दोघांची सुरवात झाली, राधिका ने एक नवी सुरवात केली…तिने कसलाही गाजावाजा न करता काम सुरू केले, अगदी मन लावून आणि योग्य व्यक्तिंना हाताशी घेऊन एक प्रोजेक्ट सुरू केला…त्यात ती रात्रंदिवस काम करू लागली…इकडे आदेश त्याचा अवॉर्ड साठी मेहनत घेत होता…तो अवॉर्ड त्याला अश्या व्यक्तीच्या हस्ते मिळणार होता जी सॉफ्टवेअर क्षेत्रात एका विलक्षण उंचीवर असेल…
राधिका चं काम कोणतं आहे, ते कुठवर आलंय याची माहिती घेण्याचा आदेश प्रयत्न करू लागला, पण तिने कसलाच थांगपत्ता लागू दिला नाही…
वर्ष झालं, अखेर अवॉर्ड चा दिवस उजाडला…त्या कार्यक्रमाला सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज मंडळींना आमंत्रण दिलं गेलं होतं… अर्थात राधिकालाही ते आमंत्रण मिळालं…आदेश ला नवल वाटलं, नुकत्याच सुरू केलेल्या बिझनेस ची माहिती इतकी वर पोहीचली कशी?? दोघेही वेगवेगळे निघाले…एकत्र गेले नाही…
कार्यक्रम सुरू झाला…अवॉर्ड ची घोषणा होणार होती, सर्वजण अगदी कान लावून सूचना ऐकत होते…कुणाचं नाव येणार? चर्चा सुरू होत्या..अखेर घोषणा झाली…
“बेस्ट स्टार्टअप अवॉर्ड गोज टू…. मिस्टर आदेश इनामदार….”
आदेश त्वेषाने उठला, अभिमानाने त्याची छाती फुलून आली… राधिका कडे “मीच जिंकलो शेवटी..” अश्या अविर्भावात बघितले….आणि तो स्टेज वर गेला…
“हा अवॉर्ड देण्यासाठी आपण निमंत्रित करणार आहोत सर्वात कमी कालावधीत शेतकऱ्यांना मदत होईल असे सॉफ्टवेअर बनवून देशाची मान जगभरात उंचावणाऱ्या आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात एक विलक्षण उंची गाठलेल्या… मिस राधिका इनामदार यांना…”
आदेश च्या मनात गोंधळ, भीती, आश्चर्य, पराभव अश्या अनेक भावना एकाच वेळी उसळून आल्या….तिथली गर्दी कुजबुजत होती..काय नशीबवान आहे नवरा…बायकोच्या हातून अवॉर्ड मिळतोय…
ज्या पुरस्कारासाठी आदेश जीवाचं रान करत होता, राधिका तर त्या पुरस्काराच्याही पलीकडे पोहीचली होती…
आदेश चा अहंकार क्षणात गळून पडला..घरी जातांना राधिका च्या सोबत जायला तो निघाला…पण राधिका ला सोडायला एक स्पेशल गाडी आलेली, आदेश ला इग्नोर करत ती गाडीत बसली आणि आदेश कडे न बघता निघूनही गेली…इतर माणसे पाहत होती…आदेश चा झालेला अपमान त्याला जाळत होता…तेव्हा त्याला राधिका चे शब्द आठवले,
“एक दिवस तुझा हाच अहंकार तुला संपवेल…”
आणि त्या दिवशी तो खरोखर आतून संपला…

(नवीन लेखाच्या अपडेट्स साठी खालील बॉक्स मध्ये नक्की सबस्क्राईब करा)

Leave a Comment